उक्षी येथील हत्तीच्या कातळशिल्पाचे लोकार्पण
उक्षी येथील हत्तीच्या कातळशिल्पाचे लोकार्पण
रत्नागिरी - तालुक्यातील उक्षी येथील 16 बाय 18 फुटी हत्तीचे कातळ खोदशिल्प रविवारपासून लोकांना पाहण्यासाठी खुले झाले. ग्रामपंचायत व लोकसहभागातून कोकणात प्रथमच या खोदशिल्पाचे संरक्षण केले आहे.
रत्नागिरी - तालुक्यातील उक्षी येथील 16 बाय 18 फुटी हत्तीचे कातळ खोदशिल्प रविवारपासून लोकांना पाहण्यासाठी खुले झाले. ग्रामपंचायत व लोकसहभागातून कोकणात प्रथमच या खोदशिल्पाचे संरक्षण केले आहे.
रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांतील 43 गावांत 71 ठिकाणी 950 खोदशिल्प आढळली आहेत. सुमारे दहा हजार ते 35 हजार वर्षांपूर्वीची ही शिल्पे म्हणजे जागतिक वारसा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शासनाच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे.
दृष्टीक्षेपात...
उक्षी गाव जगाच्या नकाशावर
मुंबई-गोवा महामार्गापासून 25 किमीवर
कातळशिल्पासूान दोन किमीवर धबधबा
गेल्या तीन वर्षांपासून कातळशिल्पांवर मोठे संशोधन सुरू आहे. सरपंच मिलिंद खानविलकर व उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधला आहे. त्याशेजारी चबुतरा बांधला असून त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते.
उक्षीस आंतरराष्ट्रीय पर्यटनाची संधी
अनुप सुर्वे यांच्या जागेमध्ये हत्तीचे शिल्प आढळले. त्यांनी विनामोबदला ही जागा उपलब्ध करून दिली. तसेच या जवळच काशिनाथ देसाई यांच्या जागेमध्ये सुमारे पंधरा विविध खोदशिल्पे आहेत. या शिल्पांची साफसफाई करून तेथेही कठडा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उक्षी गाव आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू होईल.
कातळ खोदशिल्प हा जागतिक वारसा जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. पुढील काळात आणखी काही ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्यात येणार आहेत. खोदशिल्पांचे संशोधन सुरू असून येत्या काही दिवसांत काही नवीन शिल्पे आढळतील.
- सुधीर रिसबूड
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, प्रांताधिकारी अमित शेडगे, ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल विभुते, संशोधक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, समन्वयक ऋत्विज आपटे प्रमुख उपस्थित होते.
कातळशिल्प हा जागतिक दर्जाचा ठेवा आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण केलेच पाहिजे. मानवतेचा, सांस्कृतिकतेचा वारसा जतन करून पर्यटन विकास साधण्याचे काम उक्षी ग्रामस्थांनी केल्याबद्दल घोरपडे यांनी विशेष अभिनंदन केले. कातळशिल्पासाठी सहकार्य करणाऱ्या दीपक भोसले, मंडल अधिकारी सावंत, पोलिस पाटील अनिल जाधव, ग्रामसेवक एस. जी. टापरे, तलाठी अमोल पड्यार यांच्यासह 25 ग्रामस्थांचा सन्मान केला.
पर्यटकांना पर्वणी
रत्नागिरीचे पर्यटन वाढण्यासाठी कातळशिल्पे महत्त्वाची आहेत. मुंबई-गोवा महामार्गापासून उक्षी सुमारे 25 किमी अंतरावर आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मार्गफलक उभारण्यात येणार आहेत. उक्षीमध्ये पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यासोबत कातळशिल्पे पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील कातळशिल्पेही पर्यटनासाठी उपयुक्त ठरणारी आहेत.
Comments
Post a Comment