कातळ खोदचित्र संवर्धन प्रकल्प `येथे` साकारतोय
कातळ खोदचित्र संवर्धन प्रकल्प `येथे` साकारतोय
हजारो वर्षे विस्मृतीच्या पडद्याआड असलेला खोद चित्ररुपी आदिमानवाचा आविष्कार मोठ्या प्रमाणात शोधून जगासमोर आणण्याचे काम सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्वखर्चाने व अविश्रांत मेहनतीने केले.
रत्नागिरी - कातळ खोदचित्र संरक्षण संवर्धन महाराष्ट्र राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी, अशा बहुमोल ठेव्याचे संरक्षण, संवर्धनकरिता निसर्गयात्री संस्थेने पावले उचलली आहेत. देऊड येथे खोदचित्र संवर्धनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. चित्रांना कोणत्याही प्रकारचा धोका न पोहोचता आखणी, खुले, पारंपरिक बांधणीयुक्त संग्रहालय, कल्पक बाबींनी युक्त माहिती, स्थानिक कलाकार, महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे दालन या प्रकल्पात आहे.
हजारो वर्षे विस्मृतीच्या पडद्याआड असलेला खोद चित्ररुपी आदिमानवाचा आविष्कार मोठ्या प्रमाणात शोधून जगासमोर आणण्याचे काम सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्वखर्चाने व अविश्रांत मेहनतीने केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 65 गावांतून 1500 पेक्षा अधिक खोद चित्ररचना त्यांनी शोधून काढल्या आहेत.
जगात अद्वितीय अशा या वारसास्थळांना आधुनिक विकासाचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याकरिता निसर्गयात्री संस्थेने नियोजनबद्ध विकासासाठी प्राथमिक आराखडा तयार केला. प्रथम उक्षी गावातील हत्तीचे खोदचित्र लोकसहभागातून संरक्षित केले. दुसऱ्या टप्प्यात देऊड सड्यावरील खोदचित्र ठिकाणाचे संवर्धन व अन्य बाबींना अंतर्भूत करणारा विकास प्रकल्प प्रत्यक्ष हाती घेतला आहे. जागामालक प्रसाद आपटे, माजी प्रांताधिकारी अमित शेडगे, उद्योजक दीपक गद्रे यांचे सहकार्य व ऍक्सिस बॅंकेच्या साथीमुळे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
स्थानिक रोजगार व पर्यटनपूरक विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाला वास्तूविशारद मकरंद केसरकर, पुरातत्व विभाग संचालक डॉ. तेजस गर्गे, वास्तूविशारद समीर सावंत, संग्रहालय शास्त्र अमृता ठालकर, पुरातत्त्वशास्त्र ऋत्विज आपटे, तज्ञ श्रीवल्लभ साठे, दीपक व संतोष गवाणकर, छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांची साथ लाभत आहे.
रोजगारनिर्मिती, विकासाला चालना
या प्रकल्पाद्वारे समृद्धकिनारी नांदणाऱ्या एखाद्या आद्य संस्कृतीचे अस्तित्व दर्शविणाऱ्या खोदचित्रांचे कायमस्वरूपी संरक्षण होणार आहे. तसेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती व परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
Comments
Post a Comment