कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’
कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’
मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत.
Open in App- मेहरून नाकाडे
रत्नागिरी : ऐतिहासिक काळातील सांंस्कृतिक संंदर्भ म्हणून कातळशिल्पांंचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. मात्र, ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. सर्वाधिक कातळशिल्पे ही रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात शिल्परचना सापडल्या आहेत.
विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना ‘रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स किंवा कातळशिल्प’ या नावाने ओळखले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली ही कातळशिल्प नजरेस पडल्यानंतर त्याबाबतचे कुतूहल अधिक वाढले. ही कातळशिल्प पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.
प्रामुख्याने कातळ सड्यांवर कातळशिल्प शोधमोहीम सुरु आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा येथील समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व दिशेला २५ किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरात ३७०० चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील कातळ खोदशिल्पाचे संशोधनकार्य सुरु आहे. मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील ही कातळशिल्पे असून, सुधीर रिसबूड, प्रा. सुरेंंद्र ठाकुरदेसाई, धनंंजय मराठे यांची ही शोधमोहीम गेली काही वर्षे सुरू आहे. कातळशिल्पांंच्या संंरक्षणासाठी शासनाकडून प्रथमच निधी मंंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकºयांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून त्यांची नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.
सुंदर कातळशिल्पे संरक्षित करण्यासाठी अधिनियम करुन पुरातत्व विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन आयुक्त जगदीश पाटील यांनी आपल्या कोकण भेटीत दिले होते. त्यानुसार पुरातत्व वस्तूसंग्रहालय खात्याचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे. ऋत्विज आपटे त्यासाठी कार्यरत असून, कातळशिल्पांना राज्यसंरक्षित दर्जा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
लवकरच या शिल्पांना राज्यसंरक्षित दर्जा प्राप्त होणार आहे. कातळशिल्पांबाबतचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढले आहे. अनेक पर्यटक खास कातळशिल्प पाहण्यासाठी सहली आयोजित करीत आहेत. भविष्यात ही कातळशिल्पे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावरही चांगला परिणाम होऊन स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची संधी यामित्ताने उपलब्ध होणार आहे. या कातळशिल्पांमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार असून, जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर येणार आहे.
कातळशिल्पांची ठिकाणे
रत्नागिरी तालुका - जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी - गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले. राजापूर तालुका - देवाचेगोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरेकोंब, विखारेगोठणे, बारसू, पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ. लांजा तालुका - भडे, हर्चे, रूण, खानावली, रावारी, लावगण
अश्मयुगीन कातळचित्र
रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात एक हजारपेक्षा अधिक कातळशिल्पे असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत. मंडणगड व गुहागर तालुक्यातही कातळशिल्पे सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात सात हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी या कातळशिल्पांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. आॅस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकेतील पर्यटक याठिकाणी भेट देत आहेत. ही सर्व अश्मयुगीन काळातील कातळचित्र आहेत.
कातळशिल्प म्हणजे...
इंग्रजी भाषेत जी ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाते तिला मराठीत ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘पेट्रोग्लिफ्स’ असे आहे. ग्रीक भाषेतला हा शब्द असल्याने ग्रीक भाषेत पेटाचा अर्थ पाषाण आणि ग्लिफीन म्हणजे कोरणे असा आहे. निसर्गातल्या पाषाणावर मानवाने कोरलेल्या खुणा म्हणजे ‘पेट्रोग्लिफ्स’ होय. सर्वसाधारणपणे अशी शिल्प ही गुहेच्या भिंंतीवर किंवा उभ्या पाषणाच्या पृष्ठभागावर कोरली जातात. परंतु, कोकणात ती आकाशाच्या छताखाली, कातळावर कोरली गेली आहेत. ती खोदशिल्पे ३००० वर्षांपूर्वीची असावीत, असा तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे.
चुंबकीय विस्थापन
राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे येथे २.२५ मीटर त्रिज्येचे वर्तुळ काढण्यात आले असून, इथं चुंबकीय विस्थापन आढळते. ज्याठिकाणी मनुष्याकृती कोरली आहे तिथे चुंबकसूची पूर्णपणे विरूध्द दिशा दाखवते. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी याबाबत केलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये विशिष्ट अणूरचनेमुळे चुंबकसुई स्थिर राहत नाही. ती विरूध्द दिशा दाखवते, हे स्पष्ट झाले आहे.
लोकसहभागातून संरक्षित
उक्षी येथील कातळ खोदशिल्प (चित्र) लोकसहभागातून संरक्षित करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या हस्ते झाले. देवाचेगोठणे येथील कातळशिल्पाचे ग्रामपंचायत व लोकसहभागातून संरक्षण करण्यात आले आहे. उक्षीतील कातशिल्पाचे संरक्षण केल्यानंतर गत चार महिन्यात पंधराशे पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली आहे.
निवळीच्या सड्यावरील चित्र ही सन २०००पासून लोकांना माहीत आहेत. ‘आडवळणावरचं कोकण’ यासाठी गेली काही वर्षे वाटचाल सुरू असतानाच कातळशिल्पासाररखा अमूल्य ठेवा सापडला आहे. कोकणातील ठराविक किनारे, मंदिरे, पर्यटन क्षेत्राची माहिती पर्यटकांना आहे. परंतु, आता कातळशिल्पांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली असून, पर्यटक कातळशिल्पांपर्यंत पोहोचावेत, हा यामागील उद्देश आहे. कातळशिल्पांच्या माध्यमातून राज्याचा नव्हे तर भारताचा वेगळा इतिहास जगासमोर येणार आहे. भारतातील हेरिटेज/कल्चर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. भविष्यात ते आणखी मोठ्या संख्येने येतील, अशी अपेक्षा आहे. कातळशिल्पाचे पर्यटनामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ही कातळशिल्पे लोकसहभागातून संरक्षित व्हावीत.
- सुधीर रिसबूड,
कातळशिल्प अभ्यासक, रत्नागिरी.
Comments
Post a Comment