जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी असा कोकणातील कातळशिल्पांचा अनमोल ठेवा...
जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी असा कोकणातील कातळशिल्पांचा अनमोल ठेवा...
जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी असा कोकणातील कातळशिल्पांचा अनमोल ठेवा हिरीरीने जगासमोर आणला त्याला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत.
रत्नागिरी : जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी असा कोकणातील कातळशिल्पांचा अनमोल ठेवा रत्नागिरीमधील सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई या त्रयीने हिरीरीने जगासमोर आणला त्याला आज 27 एप्रिल रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाच वर्षांच्या या प्रवासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 65 गावांतील 105 ठिकाणी सुमारे 1500 पेक्षा अधिक खोद चित्र रचना उजेडात आल्या. फक्त कोकणात आढळलेली खोद चित्रे जांभ्या दगडाच्या पृष्ठभागावर आडव्या स्वरूपात कोरून निर्माण केली हेच वेगळेपण आहे.
स्वखर्चाने घोतला चित्रांचा शोध
कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर हजारोंच्या संख्येने आढळणार्या, जांभा खडकाचा पृष्ठभाग घासून, कोरून अथवा थोडासा खरवडून निर्माण केलेल्या या खोद चित्र रचना आजही एक गूढ आहे. मानवी उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यातील कालखंडावर प्रकाशझोत टाकण्यास अत्यंत बहुमोल अशा या खोद चित्र रचनांमध्ये अनाकलनीय भौमितिक रचना आहेत. शिवाय नागमोडी रेषा, चौकोन, त्रिकोण, अगम्य भौमितिक आकार यातून निर्माण केलेल्या गुंतागुंतीच्या व मोठ्या चौकोनी उठावाच्या रचना तर्कशक्तीला आव्हान देतात.
हेही वाचा-हलगीचा कडकडाट आकसला, जगण्याचा सूर हरवला
भिंतीवर, उभ्या दगडाच्या पृष्ठभागावर
जगभरात अंटार्टिका खंड सोडल्यास सर्वत्र कमी अधिक प्रमाणात ही कला दिसते. या कलेला इंग्रजीत रॉक आर्ट तर शास्त्रीय भाषेत ‘पेट्रोग्लीफ्स’ म्हणतात. भारतात अशी चित्र भिमबेटका, पंचमढी, बदामी, कोटा, रायचूर येथे आढळली. जगभरात आढळणारी बहुतांशी खोद चित्र गुहांच्या भिंतीवर, उभ्या दगडाच्या पृष्ठभागावर आहेत.कोकणातील कातळ खोद चित्रांमध्ये संबंधित परिसराचे अर्थकारण बदलण्याचे सामर्थ्य आहे. जागतिक पातळीवर सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या चित्रांच्या संवर्धनाकरिता शोधकर्त्यांच्या मागे समर्थपणे उभे राहण्याची गरज आहे. उक्षी येथे हत्तीच्या चित्राचे संवर्धन केल्यापासून दीड वर्षांत तब्बल 40 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. कोकणची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगाद्वारे बदलू शकते, त्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
खोद चित्रे जागतिक वारसास्थळांच्या तोडीची
या खोद चित्रांमध्ये जलचर, उभयचर, भूचर तसेच पक्षी यांच्या रचना मोठ्या प्रमाणात आहेत. वाघळी, शार्क, देवमासा, ऑक्टोपस, मगर, पाण मांजर, कासव, वाघ, कोल्हा, तरस, माकड, जवादा, हरीण वर्ग, नीलगाय, रानगवा हत्ती इत्यादी प्राण्यांची चित्रे आढळतात. एकशिंगी गेंडा, पाणघोडा या प्राण्यांचे खोद चित्रांमधून होणारे दर्शन आश्चर्यचकित करते. ससाणा, बगळा वर्ग, मोर, गिधाड, गरुड इत्यादी यांच्या रचना कोकणातील कातळ खोद चित्र रचनांमध्ये आढळून येतात. भारतीय उपखंडात अस्तिव नाही अशा ‘एलीफंड बर्ड’ पक्षाची भली थोरली रचना आपल्याला विचार करावयास भाग पाडते.
हेही वाचा-महामार्गाचे काम सुरू होऊनही धोका कायम
तहान भूक विसरून पायपीट
शोधकर्त्यांनी या अश्मयुगीन खोद चित्रांचे संरक्षण संवर्धन व्हावे, यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. तहान भूक विसरून शेकडो किलोमीटरची पायपीट करून राबविलेले शोधकार्य, त्याचबरोबर काकणभर अधिक मेहनत घेऊन शासन, प्रशासन, स्थानिक पातळीवर संरक्षण संवर्धनाचे कार्य आणि जागृतीविषयक कार्यक्रम हे शब्दात मांडणे अवघड आहे.
अचल प्राणीसंग्रहालय
कशेळी येथे हत्तीची रचना तब्बल सुमारे 50 फूट लांब व 40 फूट रुंद एवढी आहे. या चित्राची भव्यता आपल्याला तोंडात बोट घालायला लावणारी आहे. खोद चित्र रचनेमधील ही भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठी रचना आहे. या परिसरात विविध प्राणी, पक्षी यांसह तब्बल 140 चित्रांचा समूह आढळून येतो. या परिसराला मानव निर्मित अचल प्राणीसंग्रहालय असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Comments
Post a Comment