जोगेश्वरीचा सिंट्रा शिलालेख!
जोगेश्वरीचा सिंट्रा शिलालेख!
हा शिलालेख म्हणजे राजा अपरादित्य पहिला (शके १०५९) याने दिलेले दानपत्रच असून तो गधेगळ आहे.

|| विनायक परब
जोगेश्वरी लेणींच्या बरोबर मध्यभागी एक उघडा भाग असून तिथे सापडलेला अपरादित्य पहिला या राजाचा एक महत्त्वपूर्ण शिलालेख सध्या पोर्तुगालमध्ये लिस्बन जवळ असलेल्या सिंट्रा इथे पाहायला मिळतो. मुंबईतील अनेक गोष्टी इथे राज्य करणाऱ्या कधी ब्रिटिशांमार्फत तर कधी पोर्तुगीजांमार्फत त्यांच्या देशात नेण्यात आल्या, त्यात या जोगेश्वरीच्या शिलालेखाचाही समावेश आहे. किंबहुना म्हणूनच हा शिलालेख सिंट्राचा जोगेश्वरी (अपरादित्य पहिला) शिलालेख याच नावाने प्रसिद्ध आहे. या शिलालेखाच्या पहिल्या १५ ओळींवर तत्कालीन तज्ज्ञ डॉ. ई. हल्टच्श यांनी काम केले. तर उर्वरित ओळी वाचून महामहोपाध्याय मिराशी यांनी त्याचे वाचन पूर्ण करण्याचे काम केले. त्याचबरोबर त्यातील काही नावे व शब्द वाचताना आलेल्या अडचणीही मिराशी यांनी दूर केल्या.
हा शिलालेख म्हणजे राजा अपरादित्य पहिला (शके १०५९) याने दिलेले दानपत्रच असून तो गधेगळ आहे. राजाने दिलेले दानपत्र हे अशाप्रकारे गधेगळाच्या रूपात नोंदविण्याची प्रथा त्या काळी मध्ययुगीन महाराष्ट्र आणि परिसरात होती. सर्वसाधारणपणे त्यावर चंद्र आणि सूर्य कोरलेले असायचे. याचा अर्थ चंद्र-सूर्य या भूतलावर असेपर्यंत हे दानपत्र व त्यातून मिळणारे पुण्य कायम राहणार असा घेतला जायचा. त्याखाली प्रत्यक्ष दानपत्र, त्यात दान दिलेल्या बाबी म्हणजे जमीन किंवा घरे यांचा उल्लेख आणि अखेरीस एका महिलेशी समागम करणाऱ्या गाढवाची प्रतिकृती कोरलेली असायची. यातील दान हे राजाने दिलेले असल्याने ते करमुक्त असून त्याच्या उपभोगात कुणी आडकाठी केल्यास त्याच्या आईस.. असे म्हणत ही शिक्षा दिली जाईल, असे धमकीवजा लेखन त्याच्या अखेरीस असायचे. जोगेश्वरीचा शिलालेख हादेखील अशा प्रकारे गधेगळच आहे. या गधेगळाच्या संकल्पनेवर डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यापासून अनेक विद्वानांनी आपापल्या पद्धतीने प्रकाशझोत टाकून संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
जोगेश्वरीच्या शिलालेखातील भाषा संस्कृत असून तो नागरी लिपीमध्ये कोरण्यात आला आहे. सुरुवातीच्या ओळी कोरताना दोन शब्दांमध्ये तसेच दोन ओळींमध्ये बरीच जागा ठेवण्यात आली आहे. तर नंतरच्या ओळींमध्ये अंतर कमी करून मजकूर त्या दगडावर व्यवस्थित कोरून बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हे कोरताना कोरक्याची गडबड उडालेली दिसते. उत्तर कोकणाचा शिलाहार राजा अपरादित्य पहिला याचे हे दानपत्र आहे. त्यात त्याने स्वत:साठी पाच बिरुदे वापरली आहेत. त्यात महामंडलेश्वराधिपती, महासामंताधिपती, तगरेश्वराधिश्वर, जिमूतवाहनाच्या कुळात जन्मलेला आणि सुवर्णगरुडध्वज मिरवणारा महासमुद्राधिपती अशा बिरुदांचा समावेश आहे. यातील महासमुद्राधिपती हे महत्त्वाचे आहे. कारण समुद्रावर त्याची अनभिषिक्त सत्ता होती, हेच यातून प्रतीत होते.
चैत्र शुद्ध द्वादशीला शके १०५९ मध्ये म्हणजेच इंग्रजी तारखेनुसार ५ एप्रिल ११३७ रोजी दिलेले हे दान आहे. याचा अर्थ एकादशीच्या व्रताचे पारणे या दानाने फेडले असावे, असा विद्वानांनी घेतला आहे. जोगेश्वरी देवीची पूजा करणारे मठाधिपती व तेथील व्यवस्था पाहणाऱ्या १३ जणांची घरे करमुक्त करण्यात आल्याचे सांगणारा असा हा शिलालेख आहे. त्या १३ जणांची नावेही यात देण्यात आली आहेत. देवीबरोबरच लिंगाची पूजा करणारा, भुत्तेवाला, माळी, कुंभार, आरती, माचला, गासाम, पारखी, वासिकाकै व उभस्थ अशी नावेही यात देण्यात आली आहेत. हे दानपत्र षटषष्टी म्हणजेच आताची साष्टी (वसईच्या खाडीपासून ते वांद्रय़ाच्या खाडीपर्यंतचा भाग) यातील देनक-६६ या समूहातील श्रीपुरी गावातील जमिनीच्या संदर्भातील आहे. यातील श्रीपुरीवरून वाद आहे. काहींच्या मते यातील पुरी म्हणजे घारापुरी होय. मात्र जोगेश्वरीचे मंदिर घारापुरीत नाही आणि जोगेश्वरी येथे देवी व लिंग पूजा दोन्ही आहे. किंबहुना जोगेश्वरी हे आधी योगेश्वर होते नंतर त्याची योगेश्वरी झाली, हा इतिहास आहे. काही नोंदींनुसार हा शिलालेख जोगेश्वरी लेणींमध्येच सापडला होता.
एखादा करार करताना त्यामध्ये साक्षीदार असतात तसे या दानपत्रांमध्येही तत्कालीन साक्षीदार आहेत. ते राजदरबारातील तत्कालीन विविध मोठे अधिकारी होते. त्यांचे उल्लेखही यात येतात. महाअमात्य श्रीमाली खेतया ठाकूर, महासंधीविग्रहक (आजूबाजूच्या राज्यांशी संबंध राखणारा तत्कालीन परराष्ट्र व्यवहारमंत्री) श्रीअमुक, राजाच्या लेखागारातील ज्येष्ठ अधिकारी असलेला श्रीलक्क्षमनेयप्रभू व कनिष्ठ अधिकारी असलेला श्रीअमुक यांचा समावेश आहे. याच अधिकाऱ्यांचे उल्लेख त्याच काळातील इतर शिलालेखांमध्येही आलेले आढळतात. तर काहींमध्ये आधी कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांना नंतर पदोन्नती मिळाल्याचेही दिसते. दिवाकरनायका, विष्णूभट्टसेना, महालु ठाकूर या राजदरबारातील अधिकाऱ्यांचे उल्लेखही यात नावानिशी येतात. एकुणातच या अशा शिलालेख व ताम्रपत्रांमधून हाती येणारी माहिती तत्कालीन साष्टी अर्थात आजच्या मुंबईचा राज्यकारभार त्या काळी कसा चालायचा व समाजरचना कशी होती, कोणत्या ठिकाणांना आणि का महत्त्व होते याची कल्पना तर देतेच. पण तत्कालीन इतिहासाची पुनर्रचना करण्यास मदतही करते. भांडुप, विक्रोळी, विहार, पवई, परळ अशा अनेक ठिकाणी मुंबईत असे शिलालेख-ताम्रपत्रे सापडली असून त्यातून उभा राहणारा मुंबईचा इतिहास विचक्षण आणि थक्क करणारा आहे.
vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab
Comments
Post a Comment