पाली भाषा
- Get link
- X
- Other Apps
Friday, March 3, 2017
पाली भाषा – तोंडओळख
पा |
ली भाषेविषयीच्या चर्चेमध्ये मला अनेक वेळा - "अहो, पाली आणि मोडी एकच ना?" हा किंवा असा मथितार्थ असलेले प्रश्न विचारले जातात. ह्या 'तोंडओळख' लेखाद्वारे पाली भाषेविषयीची थोडीशी माहिती जिज्ञासूंसमोर मांडावी अशी इच्छा आहे. अर्थातच, ही एक प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे हे सर्वप्रथम नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर असेही वाचकांच्या निदर्शनास आणावेसे वाटते की, ह्यामागील माझा उद्देश हा साधारणपणे आपल्या भारतीय संस्कृतीची थोडी माहिती इतर जिज्ञासूंसमोर आणावी असा असून कुठल्या एका धर्माचे गुण किंवा दोष अथवा कुठल्याही धर्म आणि पंथाचा प्रसार ह्यातून व्हावा असे ह्या लेखाचे उद्दिष्ट नाही.
आता मूळ विषयाकडे वळूयात. सर्वप्रथम भाषा आणि लिपी ह्यांतील भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. भाषा हे बोली माध्यम असून त्याद्वारे विचारांचे आदानप्रदान केले जाते. त्याउलट लिपी हे लिहिण्याच्या माध्यमातून प्रकट केलेले विचार होत. एका भाषेतील वाक्य कितीही लिपींमध्ये लिहिले जाऊ शकते. हे समजल्यावर हे कळणे सोपे आहे की, पाली ही एक प्राचीन भाषा आहे तर मोडी ही एक अलिकडील काळातील लिपी आहे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, जसे इंग्लिश भाषा लिहिताना आपणे रोमन लिपी वापरतो आणि तीच लिपी आपण धावती (रनिंग) लिपी म्हणून सुद्धा वापरतो. तसेच, मोडी लिपीचा उपयोग वेगाने मराठी लिहिण्यासाठी जुन्या मध्ययुगीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये केलेला दिसतो. असो.
भाषा आणि लिपीचा प्रश्न निकाली काढल्यावर पाली भाषा म्हणजे नक्की काय, कुठली, कधी बोलली जायची ह्या प्रश्नांकडे वळूयात. साधारणपणे अडीच हजार वर्षांपूर्वी मगध प्रांतात बोलली जाणारी प्राकृत भाषा म्हणजे पाली असे विद्वान मंडळींचे मत आहे. अर्थातच बरेच वेगळे मतप्रवाहही आहेत पण ह्या तोंडओळखीसाठी ही मागधी भाषा होती असे समजायला काही हरकत नसावी. अडीच हजार वर्षांपूर्वीचा मगध प्रांत म्हणजे आजचा आपला बिहार प्रांत. बिंबिसार आणि त्यानंतर राज्यावर आलेल्या अजातशत्रूच्या अधिपत्याखाली हा संपन्न असा प्रदेश होता. भगवान बुद्धांचा कालखण्डही हाच समजला जातो. अशा प्रदेशातील एक सर्वसामान्यांची भाषा म्हणून त्याला ‘मागधी’ अशी संज्ञा दिली जाते. हिचे पाली हे नाव बरेच अलीकडील असे असून ते काहीशे वर्षांपूर्वीचे नामकरण आहे असे पण तज्ञांचे मत आहे. ह्या भाषेमध्ये संपूर्ण बौद्ध वाङ्गमय आज उपलब्ध आहे. ह्या वाङ्गमयामुळे अभ्यासकाला तत्कालीन समाजरचना, सांस्कृतिक चालीरिती, राजकीय परिस्थिती इ. गोष्टींचा सांगोपांग अभ्यास करता येऊ शकतो. गंमतीचा भाग म्हणजे पाली म्हणजे जीभ बोटाने धरून बोबडे बोलणे असे पण बरेच लोक समजतात. ह्यात थोडे तथ्यही आहे पण भारताचा एक सांस्कृतिक वारसा म्हणून पाली ही एक अतिशय महत्वाची भाषा आहे असे समजायला हरकत नसावी.
भाषाशास्त्रज्ञांच्या मते पाली भाषा हा संस्कृत आणि भारतातल्या आज प्रचलित असलेल्या काही बोली भाषांमधील एक महत्वाचा दुवा समजला जातो. उदाहरणार्थ, खालील तक्ता बघा (पं. ना. वा. तुंगार ह्यांच्या पाली भाषा-प्रवेश पुस्तकातून अंशत: आणि काही बदलांसहित)
संस्कृत | पाली | मराठी | हिंदी |
चक्र | चक्क | चाक | चक्का |
कर्म | कम्म | काम | कर्म/काम |
मृत्तिका | मत्तिका | माती | मट्टी/मिट्टी |
वृद्ध | वुड्ढ | वृद्ध | बुड्ढा |
उष्ण | उण्ह | उन्ह/उन | ----- |
मस्तक | मत्थक | माथे | माथा/मथ्था |
ह्या तक्त्यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की, भाषा म्हणून आपली मराठी आणि देशभाषा हिन्दी ह्या पाली भाषेशी किती जवळ आहेत.
आज पालीचा वापर बोली म्हणून किंवा इतर माध्यमांमध्ये दिसत नाही परंतु संपूर्ण बौद्ध तत्वज्ञान आणि वाङ्गमय हे आजही पालीमध्ये उपलब्ध आहे. इ.स. पूर्व पहिल्या शतकामध्ये बौद्ध त्रिपिटक (पाली - तिपिटक) श्रीलंकेमध्ये सर्वप्रथम सिंहल लिपीमध्ये लिपीबद्ध झाले. तोपर्यन्तचा त्रिपिटकाचा प्रवास हा मौखिक असाच होता. ह्या संपूर्ण त्रिपिटकाचा आणि त्या अनुषंगाने बौद्ध धर्माचा अभ्यास आज भारतापेक्षा श्रीलंका, म्यानमार, थायलंड आणि युरोप-अमेरिकेमध्ये जोरावर आहे. पाली भाषेच्या अभ्यासामुळे भारताच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय इ. अनेक बाबींवर मोठाच प्रकाश पडतो. म्हणूनच ह्या भाषेच्या सखोल अभ्यासाची आपल्या देशात गरज आहे.
भारतातून १२ व्या -१३ व्या शतकात बौद्ध धर्माचे प्राबल्य क्षीण झाल्यावर तो धर्म आणि त्या अनुषंगाने पाली भाषा भारतातून जरी लुप्त झाली तरीही दक्षिण आशियातील श्रीलंका, म्यानमार, थायलंड ह्या देशांमध्ये जिवंत राहिली व आजही हे देश बौद्ध म्हणूनच समजले जातात. ह्या देशांमध्ये देखील पाली ही बोली भाषा नसली तरीही ती एक धार्मिक भाषा म्हणून शाळांमध्ये शिकवली जाते आणि तिचे महत्व ह्या देशांमध्ये टिकून आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून पालीकडे परत विद्वानांची दृष्टी वळली आहे आणि भाषेच्या अभ्यासासाठी अनेक शालेय, महाविद्यालयीन आणि विश्वविद्यालयांमधून ओढा सुरु झाला आहे. तरीहि अजून पालीचे विद्वान भारतात बोटांवर मोजता येतील इतकेच आहेत.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला पुणे, मुंबई, कोलकाता, वाराणसी आणि नंतर दिल्ली मध्ये विविध महाविद्यालये आणि विश्वविद्यालयांमध्ये पाली विभागांची स्थापना झाली परंतु स्वातंत्र्योत्तर काळात बरेच विभाग पुरेश्या विद्यार्थ्यांअभावी बंद झाले. त्यावेळेच्या पाली दिग्गजांमध्ये पी. व्ही. बापट, धर्मानंद कोसंबी इ. पण्डितांनी पाली भाषा शिक्षणाची धुरा वाहिली. पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या, फर्ग्युसन इ. ठिकाणी संशोधन आणि शिक्षण असे बरेच काम पालीसाठी झाले. मराठीतील प्रख्यात विनोदी लेखक चिं. वि. जोशी हे पण पाली विद्वान होते हे जाता जाता नमूद करणे गरजेचे आहे.
आज पाली भाषेसाठी उत्तम अशी शैक्षणिक केन्द्रे भारतात बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहेत. शिक्षणाच्या एकंदर बट्ट्याबोळात आणि धार्मिक संकुचितपणामुळे आपल्या सांस्कृतिक वारशांचा आपल्याला विसर पडत चालला आहे ही एक खेदकारक बाब आहे. पाली भाषा आणि त्यातून व्यक्त झालेले बौद्ध तत्वज्ञान हे आपलेच सांस्कृतिक वारसे आहेत. जितके जास्त लोक पाली शिकतील तितकाच हे वारसे जपायला हातभार लागणार आहे. बहुतांशी कर्ता, कर्म आणि क्रियापद अशी मराठीसारखीच वाक्यरचना असलेली काही पालीमधील वाक्ये सरतेशेवटी देत आहे. त्यावरून ह्या भाषेबद्दल अजून थोडीशी कल्पना वाचकांस येईल. (पं. ना. वा. तुंगार ह्यांच्या पाली भाषा-प्रवेश पुस्तकातून उदाहरणार्थ)
पाली | मराठी |
अहं बुद्धं नमामि। | मी बुद्धांना नमस्कार करतो. |
मनुस्सो धम्मं अनुसरति। | मनुष्य/लोक धर्माला अनुसरतात. |
अहं सच्चं ब्रवीमि। | मी सत्य बोलतो. |
अम्हे पाणं न हनाम, मुसावादं न वदाम, मज्जं न पिवाम। | आम्ही प्राण हरत नाही (प्राणहत्या करत नाही), खोटे बोलत नाही, मद्य पित नाही. |
- समाप्त -
- Get link
- X
- Other Apps
छान! खूप कष्ट घेतलेले लगेच लक्षात येते. एकच प्रश्न - पाली भाषेला पाली हे नाव कसे पहले?
Replyपाली शब्दाचे भाषाशास्त्रज्ञांनी बरेच अर्थ लावले आहेत. त्यातील एक म्हणजे ओळी किंवा पंक्ती.साधारणपणे ह्याचे अर्थी शब्द धरला जातो.